महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे !

0
20210223_111533

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे !

न्हावा-शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन.

अलिबाग, दि. 23 फेब्रुवारी :
सध्या राज्य, देश, संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाण्याची टंचाईदेखील मोठी समस्या आहे. पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नाव्हा-शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुंबई लगतच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढते आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर  भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,  सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, ग्रामपंचायत खानावळे सरपंच जयश्री नाईक, ग्रामपंचायत बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.

पाणी म्हणजे आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत. उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू.  माणूस तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जात आहे. मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य काय असते, ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पाहायला मिळते. तेथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्गसंपदा आहे. समुद्र किनारे आहेत. पर्यावरणाला धोका पोहोचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकवस्तीपासून दूरवर त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन कारखाने उभारावेत,  मात्र त्यासाठी वनसंपदा नष्ट करता कामा नये, असेही ठाकरे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *