‘बार्टी’तर्फे MPSC चे ऑनलाईन कोचिंग क्लास सुरु !
मुंबई दि. ३ जुलै २०२०
कोरोनाच्या संकटात सगळे ठप्पच झाले आहे. काही वर्गांच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या आहेत तर प्रत्यक्ष शाळा सुरु करणे अडचणीचे ठरत असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ऑनलाईन शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर MPSC चे मार्गदर्शन वर्गही सुरु करण्याचा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे.
MPSC परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ऑनलाईन क्लास सुरु करण्याची मागणी करत होते. याची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ‘बार्टी’ने पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था BARTI मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात आले आहेत.
एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.
