शिवजयंतीवर बंधने तर काँग्रेसच्या कार्यक्रमाला परवानगी का ?
शिवजयंतीवर बंधने तर काँग्रेसच्या कार्यक्रमाला परवानगी का ?
संगमनेर, दि १९ फेब्रुवारी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर कायद्याची बंधने घालणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना काॅग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात आणि मंत्र्यांच्या मिरवणुकांमध्ये झालेली गर्दी दिसत नाही का ॽ असा परखड सवाल भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
तालुक्यातील शिबलापूर माळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ.विखे पाटील बोलत होते.नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.रोहिणी निघुते,पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे,भगवानराव इलग रखमाजी खेमनर संचालक दिनकर गायकवाड संदीप घुगे तबाजी मुंतोडे सरपंच सचिन गायकवाड उपसंच दिलीप मुंतोडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३९१ वर्षांंनंतरही तेवढ्याच उत्साहाने साजरी होणे याचे महत्व मोठे आहे.परंतू छत्रपतीच्या नावाने राजकारण करुन सतेची पद मिळवलेल्या शिवसेनेनेच महाराजांच्या जयंती दिनाचे महत्व कमी करण्याचा निर्णय करावा याचे आश्चर्य वाटते.
एकीकडे करोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात पण दुसरीकडे सतेत भागीदार असलेल्या काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण समारंभात कोव्हीडचे नियम तोडून गर्दी होते,राज्यात मंत्र्यांचे दौरे गर्दीतच सुरू आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत काॽ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील समस्या वाढल्या आहेत.कोव्हीडच्या संकटात या सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक समाज घटकांना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.किसान सन्मान योजनतून शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करत आहे. पण केंद्राच्या नावाने टाहो फोडणारे आघाडी सरकार आज शेतकऱ्यांची वीज तोडायला निघाले आहे. दिल्लीत आंदोलनाला पाठींबा देणार्याना राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत हे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
