साताऱ्यासाठी गूड न्यूज! पुढील वर्षापासून मेडीकल कॉलेज !
मुंबई, दि. २ जुलै २०२०
सातारकरांची मेडिकल कॉलेजची इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेडीकल कॉलेजसाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील ६४ एकर जागा देऊन त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील ७० एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे.
मुंबईत विधान परिषद सभापतींच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मेडीकल कॉलेज ही सातारावासियांची गरज असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र इमारतीचे बांधकाम हे कलात्मक, दर्जेदार, पुढील शंभर वर्षांचा विचार करुन करण्यात यावे. तोपर्यंत, उपलब्ध आरोग्य यंत्रणेचा उपयोग करुन पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात मेडीलक कॉलेजचे कामकाज सुरु करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी २०१२ मध्ये साताऱ्यासाठी ४१९ कोटी खर्चाचे १०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नाही. आता मंजुरी मिळाली असून यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी दिला.
