ऑगस्ट क्रांती मैदानावरून महाराष्ट्र काँग्रेसचे ‘मोदी सरकार चले जाव’!
महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी याच भूमीतून पुन्हा क्रांती करून नवा इतिहास घडवा !: एच. के. पाटील.
सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे नरेंद्र मोदी हे ‘ढोंगीजीवी’ !: नाना पटोले.
ऑगस्ट क्रांती मैदानावरून महाराष्ट्र काँग्रेसचा ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा.
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी:
नाना पटोले यांची नेत्यांवरची निष्ठा, शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता अशी प्रतिमा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलेला असून ते या विश्वासला खरे उतरतील. केंद्रात जनविरोधी, राष्ट्रविरोधी, शेतकरी विरोधी मोदी सरकार असून सहा वर्षात देशातील राजकीय, सामाजिक घडी विस्कटलेली आहे. मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून भांडवलदारांसाठी काम केले जात आहे. या सरकारला खूर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे सांगून महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारे राज्य आहे. या राज्याने इतिहास घडलेला आहे. याच तेजपाल हॉलने देशात क्रांतीकारी इतिहास घडवला आहे. आज पुन्हा मोदी चले जाव चा नारा देऊन महाराष्ट्र पुन्हा इतिहास घडवेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडला त्यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंडित नेहरूपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारनी देशात मोठे प्रकल्प उभे केले, संस्था उभा केल्या, विकासाची गंगा आणली. परंतु काँग्रेस सरकारने उभे केलेले एअर इंडिया, भेल, विमा कंपन्या, रेल्वे हे सर्व मोदींनी आता विकायला काढले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोकण रेल्वेही विकायला काढली आहे. देश विकण्यासाठी मोदींना जनतेने सत्ता दिलेली नव्हती. आता मोदी सरकारला यापुढे महाराष्ट्रातील एकही सरकारी मालमत्ता विकू देणार नाही, असा इशारा नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
नाना पटोले पुढे म्हणाले की, मागील सहा वर्षात मोदी सरकारने मनमानीपद्धतीने कारभार चालवलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. पण नरेंद्र मोदी यांना त्याचे दुःख नाही. म्हणून या अन्यायी, अत्याचारी मोदी, भाजपा, आरएसएस सरकारला हुसकावून लावण्याचे काम करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत नाना पटोले यांनी सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे ढोंगीजीवी आहेत असा टोला लगावला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले हे धडाडीचे नेते आहेत. काँग्रेसला नानांच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी एकदा ठरवले की ते तडीस नेणारच असा त्यांचा स्वभाव आहे. आताही त्यांनी राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. यात त्यांना यश येईल. लोकांपर्यंत पोहचून व गावोगावी जाऊन काँग्रेसला पुन्हा एकदा सोनियाचे दिवस आणू असा विश्वास व्यक्त करून थोरात यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.
नाना पटोले यांनी सकाळी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधानभवन परिसरातील सर्व महापुरुष तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावकेड लक्ष वेधण्यासाठी मंत्रालय ते गिरगाव चौपाची ट्रॅक्टर प्रवास केला व तेथून इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करत बैलगाडीने ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत प्रवास केला.
महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी भाजीपाल्याचा हार घालून नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मान्यवरांचा सत्कार केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय लाखे पाटील व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
