‘पेसा’ सारख्या कायद्यांमुळे आदिवासी विकासाला गती.

0
20210204_132808

‘पेसा’ सारख्या कायद्यांमुळे आदिवासी विकासाला गती.
नाशिक दि. ४ फेब्रुवारी:
आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी यांचे गावात आगमन होताच त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. गुलाबी रंगाने सजलेली घरे आणि पारंपरिक वेशात असलेले गावकरी आणि त्यांच्याकडून झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने राज्यपाल कोश्यारी भारावले. त्यानंतर सभास्थानी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि गिर्यारोहक हेमलता गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक वाद्य पावरी आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर आहे. येथील आदिवासी बांधव विकासाची संधी शोधत आहेत त्यांना ती संधी पेसा सारख्या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. याशिवाय वनपट्टे कसण्यासाठी त्यांना देण्यात येत आहेत, त्याचाही उपयोग हे बांधव करत आहेत. या भागात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *