मुंबई महापालिकेचा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प!
मुंबई महापालिकेचा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प!
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी:
मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज ३९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात १६.७४ टक्के वाढ झाली आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे.
महानगरपालिकेने यंदा घरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्ष कोरोना संकटांशी दोन हात करण्यात गेले त्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत महसूल उत्पन्नात ६३६.७३ कोटींनी घट झाली आहे.
राज्य सरकारकडून महापालिकेला ५२७४ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी येणे असून त्यात शिक्षण खात्याकडून ३,६२८ कोटी ८३ लाख रुपयांचा समावेश आहे.
पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट देण्यात आलेली आहे. संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही.आरोग्य सेवा- सुविधांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करून ४ हजार ७६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ९६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांतील मालमत्ता कराची थकबाकी १५ हजार कोटींपेक्षाही जास्त झाली आहे. तर विकास शुल्क वसुलीतही घट आली आहे.त्यामुळे पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करणे, पालिके कडून देण्यात येणाऱ्या सेवासाठी करण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करणे, शासनाकडील ५ हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुली करणे, मालमत्ता कर वसुली करणे या उपाय योजनांद्वारे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
शिक्षण विभागासाठी यंदा २९४५.७८ कोटींची तरतूद करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. नव्या सिबीएसई शाळांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. तर महापालिका शाळांचे नामकरण आणि लोगो बदलण्यावर भर देण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेत २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ७५० कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने एमआरआयडीसीएल मार्फत १६७५ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च असलेली १२ पुलांची कामे हाती घेण्याचे प्रस्ताविले आहे.
२५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रकमेची पुलांची कामे, मिठी नदी, पोयसर/दहिसर वालभाट नदी संबंधितील कामे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या पंपिंग स्टेशन, बोगद्यांची कामे आणि पुराचा सामना करण्याकरिताची मोठ्या स्वरूपाची भांडवली कामे हाती घेण्याचे प्रस्तावले आहे. यासाठी ७८८४ कोटींची आवश्यकता आहे.
‘विशेष प्रकल्पांसाठी निधी’ निर्माण करण्याचे तसेच सदर निधी अंतर्गत ४००० कोटी (अर्थसंकल्प ‘अ’ अंतर्गत २००० कोटी आमि अर्थसंकल्प ‘ग’ अंतर्गत २००० कोटी रुपये) संचित वर्ताळ्यामधून वर्ग करण्याचे प्रस्ताविण्यात आले आहे.
कोस्टल रोड प्रकल्पासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्या (जी.एम.एल.आर.) प्रकल्पासाठी १३०० कोटी रुपये इतकी तरतूद
मुंबई वाहनतळ प्राधिकरणासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी ९६१.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
