१८८ च्या नोटीसा मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय.

0
20201112_213436

कलम १८८ च्या नोटीसा मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय.
गृहमंत्र्यांचे आश्वासन : नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ..

मुंबई, दि. 20 जानेवारी  :

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी पाठविलेल्या कलम १८८ च्या नोटीसा मागे घेण्याबाबत गृह विभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ, असे आश्वासन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख, विनोद पवार यांनी गृह मंत्र्यांची भेट घेऊन नागरिकांवर होत असलेली कारवाई मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन दिले. प्रदीप देशमुख म्हणाले, रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलीसांनी समज देऊन त्यांची नावे लिहून घेतली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ नुसार कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात येत आहे. यातील अनेक नागरिक काही निकडीच्या कामासाठीही घराबाहेर पडले होते. त्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली. आता त्यांना नोटीसा येत असल्यामुळे कायदेशिर कारवाईची भीती निर्माण झाली आहे.

एकट्या पुणे शहरातच असे २८ हजारांवर नागरिक आहेत. राज्याचा विचार केला तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम १८८ नुसार पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणी गृह मंत्र्यांकडे केली आहे. गृह मंत्र्यांनी गृह विभागाच्या सचिवांशी चर्चा करून राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *