गोसीखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करा !

0
IMG-20210108-WA0016

गोसीखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करा !
नागपूर, दि. 8 जानेवारी:
पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट देऊन आढावा घेतला. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा, भूसंपादनाची कामे तात्काळ पूर्ण करून सिंचनातून कृषी व पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी ब्रम्हपुरी येथे घोडाझरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळच बैठक घेवून प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. तसंच गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेली कामं, या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे.

गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करताच या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पूर्नवसन करुन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्‍टर एवढी आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा 1146.075 दशलक्ष घनमीटर एवढा राहणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम, विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *