संकट काळात सेवाभावाने समाजसेवा करण्याची गरज!

0
20210108_110202

संकट काळात नागरिकांनी सेवाभावाने समाजसेवा करण्याची गरज !

पावनधाम, बंट संघ आणि बिलावार असोसिएशनच्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार.

मुंबई, दि. 8 जानेवारी :
देशावरील संकटाच्या काळात प्रत्येक नागरिकाने सेवा, करुणा आणि समर्पित भावनेने समाजसेवेचे कार्य केल्यास कोणत्याही संकटावर मात करणे शक्य आहे. हे कोरोना योद्ध्यांच्या कार्यातून अधोरेखित होते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पोयसर जिमखानाद्वारा आयोजित पावनधाम कोविड केअर सेंटर, बंट संघ आणि बिलावार असोसिएशनच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ राजभवन येथे झाला. यावेळी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील योद्ध्यांसह अविरत सेवा देणाऱ्या आजी-माजी अध्यक्षांचाही राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम केले यातून एकसंघ समाज उभा झाला. सर्वांनी अंत:करणातून समाजसेवा केली. अनेकांनी पशुसेवाही केली. हे कोरोना योद्ध्यांच्या कार्यातून अधोरेखित होते. देशावरील संकटावेळी एकमेकांतील शत्रुत्व आणि मतभेद विसरुन देशवासी एकत्र येवून काम करतात. ही आपली परंपरा आहे. अशा रितीने पुढील काळातही कार्य झाले पाहिजे. सेवा, करुणा आणि समर्पित भावनेने समाजसेवा केल्यामुळेच देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. कोरोनासारख्या भयावह आजाराच्या काळात रुग्णांचे नातेवाईकही सेवेसाठी येऊ शकत नसत अशा स्थितीत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेवून कार्य केले. याचा मला अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने नोकरीच्या भावनेने नव्हे तर सेवेच्या भावनेने समाजसेवा केली पाहिजे. तसेच हृदयात नेहमी दया, सेवा आणि करुणेचा भाव राहिला पाहिजे, अशी भावनाही राज्यपाल यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार पराग शहा, भारती विकास संस्थांचे डॉ.योगेश दुबे, बंट संघाचे अध्यक्ष पद्मनाभ पय्यड, बिलावार असोसिएशनचे चंद्रशेखर पुजारी यांच्यासह बंट संघाचे आणि बिलावार असोसिएशनचे आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *