अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, संसदेत राडा!
अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, संसदेत राडा!
वॉशिंग्टन, दि. 7 जानेवारी :
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा परभव झाला पण हा पराभव ते मान्य करण्यास तयार नाहीत. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन तुफान गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक इमारतीबाहेर जमले होते आणि बैठक सुरु असतानाच
अमेरिकन लोकशाहीचे प्रतिक समजले जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केला. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी आपला पराभव अजून मान्य केला नाही. सत्तेवर राहण्यासाठी सर्व मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले होते.
हिंसाचाराच्या घटनेदरम्यान ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट १२ तासांसाठी बंद केले. ट्रम्प यांच्याकडून सातत्याने खोटी माहिती देणारे, दिशाभूल करणारे ट्विट करण्यात येत होते. त्यानंतर ट्विटरने हे पाउल उचलले. त्याआधी ट्विटर, फेसबुक आणि युट्युबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे सर्व लहान व्हिडिओ डिलीट केले. या व्हिडिओमध्ये ट्रम्प आपल्या समर्थकांना घरी जाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, त्यातही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता. हे व्हिडिओ ट्रम्प समर्थक संसदेत घुसल्यानंतर दोन तासांनी पोस्ट करण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले जो बायडन यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. संविधानाचे संरक्षण करण्याचे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांना केले. अमेरिकेच्या संसदेत झालेला प्रकार निंदनीय असून कायदा, संविधान न मानणाऱ्यांची संख्या कमीच असल्याचे त्यांनी म्हटले. असे प्रकारचा गोंधळ हा देशद्रोह असल्याचे बायडन यांनी म्हटले.
