मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन द्या !
मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन द्या !
मुंबई, दि. 6 जानेवारी :
मुंबई शहरामध्ये एसआरएच्या धर्तीवर घर उपलब्ध करुन दिल्या जाते त्याचप्रमाणे गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे तातडीने उपलब्ध करुन द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याबाबत विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (1) भूषण गगराणी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष बोबडे, कामगार विभागाचे सह सचिव स.मा. साठे, कामगार उपायुक्त गिरीश लोखंडे, गृहनिर्माण उपसचिव रा.को. धनावडे, अवर सचिव अरविंद शेठे, यांसह गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी.के. आंब्रे, उदय भट, तसेच गिरणी कामगार उपस्थित होते.
पटोले म्हणाले, मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे. गिरणी कामगारांच्या घरासाठी अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. अर्जाची छाननी तातडीने करावी. तसेच गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच जमीन उपलब्ध करुन त्याचे पूनर्वसन मुंबईतच करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
गिरणी कामगारांसाठी 2001 मध्ये शासनाने धोरण निश्चित केले असून या धोरणाची अंमलबजावणी तातडीने पूर्णत्वास न्यावी, असे निर्देशही पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
