Ads

-

विलासकाका उंडाळकर यांचे निधन!

By Xtralarge News

January 4, 2021 12:33 pm

Ads

विलासकाका उंडाळकर यांचे निधन!
कराड, दि. 4 जानेवारी :
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले. १२ वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांचे काम त्यांनी पाहिले. सहकार क्षेत्रातही त्यांच्या नावाचा दबदबा होता. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने विलासकाकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही साताऱ्याच्या राजकारणातील त्यांचे महत्त्व कायम होते.

विलासकाका उंडाळकर यांना श्रद्धांजली….

विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली. ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

 

No comments to show.

Leave a Comment