औरंगाबाद, ३१ डिसेंबर
शहराची नावं बदलून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर, विकासाची काम करण्यावर आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी स्थानिक पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, राज्यात तीन पक्षाचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही. घटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. त्या घटनेतील तत्वाला बाधा येईल असा निर्णय घेतला जाणार नाही. नाव बदलण्याचा विषय आमच्यासमोर आलेला नाही परंतु ज्यावेळी चर्चेस येईल त्यावेळी काँग्रेस पक्षाचा नाव बदलण्यास विरोध आहे हे निदर्शनास आणून देऊ असेही थोरात म्हणाले.