कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी फडणवीस मैदानात.

0
20201229_144641

नवीन कृषी कायदे शेतकरी हिताचेच!
कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी फडणवीस मैदानात.
सांगली, दि. २९ डिसेंबर:
मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशात सध्या वातावरण तापले आहे. हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत अशी भूमिका घेत दिल्लीच्या रस्त्यावर एक महिन्यांपासून हजारो शेतकरी ठाण मांडून बसलेत. शेतकऱ्यांच्या भूमिकेला देशभरातील बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला आहे परंतु हे कायदे शेतकरी हिताचेच आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री करत आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यात्रेच्या माध्यमातून कृषी कायद्याचे जोरदार समर्थन करत विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय झाले की अन्य राजकीय पक्षांच्या पोटात का दुखतं हा मोठाच प्रश्न आहे. आपली राजकीय दुकानदारी बंद होऊ नये म्हणून अनेक नेते अस्वस्थ आहेत. या कायद्याने बाजार समित्या बंद होणार नाहीत, केवळ पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. फळे आणि भाजीपाला नियमन मुक्तीचा फायदा आपल्यासमोर आहे. बाजार शेतकऱ्यांच्या हाती आणणे हा या कायद्यांचा मुख्य हेतू आहे.

नवीन शेती कायदे महाराष्ट्रानेच त्वरित लागू केले आणि लगेच भूमिका बदलली. आपण तेच करायचे आणि तेच नरेंद्र मोदी यांनी केले की त्यांच्यावर आरोप करायचे अशी दुटप्पी भूमिका आता चालणार नाही. शेतकऱ्यांनी हे पुरते ओळखले आहे. केरळ बाजार समित्या ठेवत नाही आणि दिल्लीत जाऊन आंदोलन करता, केवढा हा दुटप्पीपणा? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जितके निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाले, तेवढे आजवर कधीच झाले नाहीत. एमएसपी, एफआरपीचे निर्णय झाले. शेतकरी हिताचे निर्णय यापुढेही होत राहतील आणि बळीराजा त्या निर्णयाच्या बाजूनेच उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याने हमीभाव संपणार नाही पण विरोधकांकडून मात्र भ्रामक प्रचार केला जात आहे. कंत्राटी शेतीबद्दल पसरवले जात असलेले आक्षेपही चुकीचे असून त्यामुळे फायदा होणार आहे असेही दवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *