मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसचा !

0
IMG-20201229-WA0028

मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसचा !

काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा निर्धार ..

मुंबई, दि. 29 डिसेंबर:

मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावण्याचा निर्धार करत मुंबई चा पुढचा महापौर काँग्रेसचा असेल असा निर्धार केला आहे. मुंबई काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी पदभार स्विकारला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर नेत्यांना आक्रमक भूमिका घेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा केली.

या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेलाही इशारा दिला. यूपीएच्या नेतृत्वाबाबत बाहेरच्या पक्षांनी सल्ला देता कामा नये. सोनिया गांधी याच आमच्या अध्यक्षा व नेत्या आहेत आणि कायम त्याच राहणार आहेत. आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोललेले आम्ही सहन करणार नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांचा जोश आणि ऊर्जा बघून मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपण भरघोस यश मिळवू. २२७ जागांवर लढायचे की नाही त्यावर आपण चर्चा करून ठरवू पण काँग्रेसचा महापौर किंवा आपल्याशिवाय सत्ता नाही या परिस्थितीसाठी सगळ्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा’, अशा सूचना एच. के. पाटील यांनी केल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लावली तर मुंबईचा महापौर काँग्रेसचा होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तीन पक्षाचे सरकार आहे त्यात काही प्रश्न आहेत पण पक्षाचा व पक्ष नेतृत्वाचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड करणार नाही.’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, आगामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही. येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही.

भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. काँग्रेससोबत नसती तर राज्यात सरकार बनलं नसतं, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला नाव न घेता इशारा दिला. किमान समान कार्यक्रमबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *