सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी अस्मिताही सोडली!

0
IMG-20201220-WA0036

सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी अस्मिताही सोडली !

मुंबई, दि. २० डिसेंबर:
कालपर्यंत शिवसेना जनतेसाठी सेवा देत होती, पण आज सत्तेसाठी आचार विचार सोडणा-या शिवसेनेचे खरे रुप आपण पाहत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवर निवडणूक लढविली व ते विचार जनमानसात रुजविले. पण शिवसेनेकडे हिंदुत्वाचा विचार आज कुठे आहे. उध्दव ठाकरे यांनी अनैसर्गिकरित्या सत्ता स्थापन करुन हिंदुत्वाचा विचार सोडून दिला आहे. सत्तेसाठी लाचार होत मराठी अस्मिताही सोडली. शिवसेनेने आपले आचार विचार मातीमोल करून टाकले. काँग्रेसनेही केवळ तीन-चार मंत्रीपदासाठी आपले विचार गहाण ठेवले अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

दरेकर म्हणाले, एका वर्षात मराठी शाळा बंद होत आहेत. विधिमंडळात मी त्यांना प्रत्युत्तर दिले की, विकासात खडा कोण टाकत आहे. कारशेड झाली असती पण तुम्ही स्वतःच्या आमदारांसाठी कांजूर मार्गला कारशेड नेली, मग कोणी विकासात खडा टाकला. धारावीतील लोकांना घरे मिळणार होती प्रकल्प तयार होणार होता पण या सरकारने योजनेला स्थगिती दिली. अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत.

धनगर समाजाच्या आराक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटत नव्हता पण देवेंद्र फडणवीस यांनी १००० कोटी रुपयांची तरतूद धनगर समाजासाठी केली. एका वेळेस समाजातील सर्व घटकांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले. पण राज्यात अनैसर्गिकरित्या सत्तेत आल्यानंतर आपल्या योजनांना स्थगिती देण्याचं काम ठाकरे सरकारने केले. आदिवासी, दलित, धनगर समाजाच्या प्रश्नावर कधीच ठाकरे सरकारने काम केलं नाही.

काँग्रेसने वर्षोनुवर्षे राज्य केले. गरिबी हटवण्याचा नारा दिला, पण गरिबी हटावचे नारे फुकट गेले, गरीब गरीब राहिला व त्यांचे पुढारी मात्र श्रीमंत होत गेले. राज्यात तीन पक्ष जरी एकत्रित झाले असले तरीही त्या पक्षांचे तळागाळातील कार्यकर्ते अद्यापही मनाने एकत्रित झालेले नाहीत, त्यांच्यामध्ये समन्वय नाही असे दरेकर म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *