मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारे सरकार कंत्राटदार धार्जिणे

0
20201030_185603

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारे सरकार कंत्राटदार धार्जिणे…

मंत्र्यांच्या बंगल्यांवर वर्षभरात ९० कोटी रुपये खर्च !

मुंबई दि. १४ डिसेंबर :
राज्यावरील कोरोनाचे संकट व त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या सरकारला आता संवेदना राहिल्या नसून हे सरकार कंत्राटदार धार्जिणे झाल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावलेली असतानाच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात सुमारे ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरोग्य विभागासाठी जी तरतूद आहे. त्यामधून ५० टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, असेही त्यांनी निर्दशनास आणून दिले.

आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचं भान सरकारला असायला हवं. पण कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे या सरकारचं लक्ष असून हे सरकार कंत्राटदारधार्जिणं झाल्याचा आरोप करताना दरेकर म्हणाले की, मंत्र्यांनी लाईट बिलं भरलं नाही तरी चालते. त्यांच्या बंगल्यावरील उधळपट्टीही चालते.पण नागरिकांना भरमसाठ वीज बिलं आली आहेत हा प्रश्न सरकार सोडवत नाहीत. यावरून सरकारची कार्यपद्धती दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या तिजोरीवर अधिकचा भार आल्याने जिल्हास्तरावरची विकास कामे धीम्या गतीने सुरू आहे. जिल्हास्तरावर केवळ 33 टक्के निधी दिल्याने विकास कामांना कात्री लागली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *