यंदाचा गणेशोत्सव कसा असेल, भव्य गणेशमूर्ती असतील का?
मुंबई, दि. २७ जून २०२०
कोरोनाचे विघ्न आपल्या लाडक्या बाप्पावरही आले आहे. हे संकट मोठे असून महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षी मात्र साधेपणानेच साजरा करावा लागणाराय. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भव्य गणेशमुर्ती..परंतु यावर्षी बाप्पाच्या मूर्तीची उंचीसुद्धा कमी करावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात तसेच श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी त्यांनी चर्चा केली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर या चर्चेत एकमत झाले. गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावरही एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील याकडे लक्ष द्यावे व उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरले आहे.
श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल व गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य व संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल.
कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले आहे. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या आहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच! असे मुख्यमंत्री म्हणाले.
