पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 6695 कोटींचा प्रकल्प!

0
IMG_20201210_232006

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 6695 कोटींचा प्रकल्प !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी.

पुणे, दि. 10 डिसेंबर :
पुणे व मुंबई या दोन शहरामधील प्रवासासाठी आणखी कमी वेळ लागणार आहे. द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा असलेल्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोर घाटमाथा परिसरात नागमोडी वळणे व तीव्र चढ उतार आहेत. घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर झाला आहे म्हणूनच हा नवा मार्ग टाकला जात आहे.

या प्रकल्पाचे नाव ‘मिसिंग लिंक’ असून काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या प्रकल्पाला भेट दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेचं काम सुरु आहे. त्या अंतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा, सिंहगड संस्था हा मार्ग होत आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 19.80 किलोमीटर असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील 5.86 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करण्याचं काम सुरु आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था ) या भागातील 13.3 किलोमीटर राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट बांधण्यात येणार आहेत.

आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (6 लेन) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (4 लेन) एकत्र येतात आणि खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट आणि चढ उताराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागते. त्यातून वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून हा प्रकल्प राबवला जात आहे.

हे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित असून या प्रकल्पाची एकूण किंमत ६६९५.३७ कोटी इतकी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *