Pandharpur police

सोलापूर/पंढरपूर, दि. २६ जून २०२०

आषाढी वारीचे निमित्त गाठून तुम्ही सालाबादप्रमाणे यंदाही पंढरपुरला जाणार असाल तर थांबा. तुम्हाला पंढरपुरला जाता येणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने वारीसाठी प्रवेश बंद केला आहे (No Entry). २९ जून ते २ जुलै असे चार दिवस पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर कोणी पंढरपुरात जात असल्याचे दिसले तर कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

दरवर्षी पंढरीत आषाढी वारीसाठी जवळपास १०-१२ लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात परंतु यावेळी त्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. वारीची परंपरा खंडीत पडू नये म्हणून शासनाने यंदा मर्यादित भाविकांनाच परवानगी दिलेला आहे.परवानगी नसणाऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस प्रशासन सज्ज असून जवळपास १५०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पंढरपूरला येण्यासाठी आता परवानगी देणे बंद केले आहे, असे असताना कोणी विनापरवानगी आलेच तर त्यांना पोलिसांची नजर चुकवून जाता येणार नाही. जिल्हा प्रवेश, तालुका प्रवेश आणि शहराच्या लगत अशा तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

दुसरीकडे आषाढी वारीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून २९ जुन ते २ जुलै हे चार दिवस संचारबंदी असणार आहे. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केलेली आहे. प्रत्येक पोलीसाला १० मास्क, सी व्हीटॅमिनच्या गोळ्या, फेस शिल्ड आणि रेनकोट असे साहित्य देण्यात आले आहे. याशिवाय पोलीसांचे थर्मल टेस्टिंग आणि इतर तपासणी केली जाणार आहे. तर मंडळी, मग कशाला सुखाचा जीव दुखात टाकता. घरीच रहा आणि पांडुरंगाला नमस्कार करा… बोला जय हरी विठ्ठल !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *