पवारांचा 80 वा वाढदिवस भव्य दिव्य करणार!

0
20201209_184056

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘व्हर्च्युअल रॅली…

पवारांचा वाढदिवस अनोख्या व वेगळया पध्दतीने साजरा करणार.

पुणे, दि. ९ डिसेंबर:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस एका अनोख्या व वेगळया पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय  राष्ट्रवादीने घेतला आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हयातील ३५० पेक्षा जास्त तालुक्यामध्ये हा कार्यक्रम व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून दाखवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून जवळपास सात ठिकाणाहून राष्ट्रवादीचे विविध नेते त्यात सहभागी होणार आहेत. सर्वात प्रमुख कार्यक्रम हा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अगदी मोजक्याच लोकांमध्ये व हॉलची मर्यादा लक्षात घेऊन केला जाणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रभरातील जनतेला पाहता येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एक नवीन वेबसाईट आधुनिक पध्दतीने तयार केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अॉनलाईन मेंबरशीप ड्राईव्ह सुरू करणार असून डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसची डिजिटल पावती फाडतील आणि या उपक्रमाची सुरुवात राज्यात सुरू होईल.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पक्षाने राज्यातील जनतेचे प्रश्न, सूचना, कार्यकर्त्यांचा पक्षाबद्दलचा अभिप्राय असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम २२ दिवस चालला. या उपक्रमात जवळपास ९ लाख लोकांनी सहभाग घेऊन आपला अभिप्राय नोंदवला होता. या उपक्रमात चांगलं काम केलेल्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे. शिवाय पक्षाच्यावतीने पवार यांच्या जीवनावर आधारित शॉर्टफिल्म ‘योध्दा@८०’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देशातून व राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. यामधील उत्कृष्ट तीन विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र आणि उत्तम फिल्ममेकरांचा सन्मान केला जाणार आहे.

कोरोना काळात अनेक समाजांना फार मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये आदिवासी समाजातील लोकांना सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासी भागात एकाचवेळी सुमारे एक लाख मेडिकल किट्स वाटप केली जाणार असून शरद पवार यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ते दिले जाणार आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असून वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पुढाकाराने दिनांक १३ ते २० डिसेंबरपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सात दिवसात विक्रमी रक्तदान करून रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढला जाणार आहे.

राज्यात राष्ट्रवादीच्यावतीने पहिल्यांदाच डिजिटल रॅलीची संकल्पना राबवली जात आहे. या माध्यमातून ४०० – ५०० ठिकाणी या डिजिटल रॅलीत अडीच ते तीन लाख लोक सहभागी होतील असे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाचे भान ठेवून आदरणीय शर पवारसाहेबांना भेटण्यासाठी कुणीही आमदार, खासदार, पदाधिकारी येणार नसून ज्या ज्या ठिकाणी डिजिटल रॅली आयोजित करण्यात आली आहे त्या त्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, व अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *