नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरा!
नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरा.
विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची सूचना.
मुंबई, दि. 7 डिसेंबर :
नर्सींग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत .
साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्यावतीने वेबिनार घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले.त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.
या वेबीनारच्या अध्यक्षतेस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सींग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर,डॉ. स्मिता राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने नर्सेससाठी प्रथमच ऑनलाईन वेबीनार आयोजित करण्यात आल्याची आणि नर्सेसना आपल्या समस्या,अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कोरोना काळात नर्सेसनी केलेल्या अत्यंत चांगल्या कामाची मांडणी करतानाच त्यांना आलेले अनुभव, अडचणी यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.
कोरोनाचा काळ हा कठीण काळ होता.या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी,डॉक्टर्स, शासनाचे विविध विभाग यांनी अत्यंत कष्टाने ह्या आपत्तीला तोंड दिले व आवश्यक उपाययोजना केल्या. याबाबत विविध वक्त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपायायोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात बैठक घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.
