जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान.

0
IMG_20201206_205903

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे मुंबई विद्यापीठात कोनशिला अनावरण.

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान.

मुंबई, दि. ६ डिसेंबर :
मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचा कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये संपन्न झाला. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक क्रांती केली. संविधान लिहीले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे यासाठी लढा दिला. एकीकडे परकीयांशीही लढा दिला. दुसरीकडे समतेसाठी स्वकीयांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले.

बाबासाहेबांना वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा प्रचंड व्यासंग होता. पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. ज्ञानार्जनासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणी, कष्ट यापुढे कोणत्याही व्यक्तिच्या, गोरगरीबांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शासन कार्य करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातूनही यासाठी निश्चितच दिशादर्शन होईल. हे संशोधन केंद्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीशी संलग्न असेल, तसेच ते कोलंबिया विद्यापीठाशी सुद्धा संलग्न झाले पाहीजे. बाबासाहेबांनी आपले ज्ञान स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता देशाला त्याचा उपयोग करुन दिला. देशाला संविधान दिले. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार यापुढील काळातही सर्वांना दिशादर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे रहात आहे. त्यांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *