डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारक कामाच्या दर्जासाठी एक समिती व्हावी

0
20201205_213418

डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारक कामाच्या दर्जासाठी
एक समिती व्हावी – आनंदराज आंबेडकर

मुंबई , दि.०५, डिसेंबर :

सरदार पटेलांचे स्मारक मोदी सरकारने दोन वर्षांत उभे केले. पण इंदूमिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. स्मारकाचे काम गतीने आणि दर्जेदार व्हायचे असेल तर त्यासाठी आंबडेकरी कार्यकर्ता, विचारवंतांचे प्रतिनिधीतत्व असलेली एक समिती सरकारने बनवावी, अशी आग्रही विनंती इंदूमिल डॉ.आंबेडकर स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.

सरकारकडे पैसा नसेल तर त्यांनी या स्मारक कामातून बाजूला व्हावे. आंबेडकरी जनता एक एक पैसा उभा करीत हे स्मारक उभारू शकते, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

बाबासाहेब हे भारताचे राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इतरही समाजाने आग्रही असले पाहिजे असेही आनंदराज म्हणाले.

डॉ.आंबेडकर थॉट्स मोव्हमेंट युट्यूब लाईव्ह या चॅनेलच्या माध्यमातून शनिवारी त्यांनी चैत्यभूमीवरून जनतेशी संवाद साधला.

केंद्र सरकारने हे स्मारक २०२०पर्यंत पूर्ण करू अशी घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात अद्याप एक वीट ही रचली गेलेली नसल्याचे सांगत सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पूर्वीच्या राज्य सरकारने स्मारक कामाला गती दिली नाही आणि आताचे राज्य सरकार हवे तसे लक्ष या कामात देत नाही. हे स्मारक समुद्राजवळ असल्याने त्यांची गुणवत्ता जपणे गरजेजे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. घाईघाईत निर्णय घेतले जात आहेत. अशावेळी समनव्य आणि दर्जा राखायचा असेल तर शासनाने एक समिती बनवायला हवी. त्यात स्मारक आंदोलनाचे कार्यकर्ते, विचारवंत असावेत. जेणे करून लक्ष ठेऊन काम जलद गतीने पूर्ण करता येईल.

स्मारकाचे काम पूर्ण झाल्यावर त्याची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी स्मारकात व्यवस्था असावी, अशा काही सूचना आम्ही दिल्या आहेत. त्याचाही विचार व्हावयाला हवा असे आनंदराज म्हणाले.

करोना संकटात चैत्यभूमीवर येण्याचा आग्रह धरू नये. यंदा ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था आहे. तेथूनच अभिवादन करावे अशी विनंती त्यांनी राज्यातील जनतेला यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *