पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव

0
20201128_201024

पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव.

पुणे, दि. 28 नोव्हेंबर:
ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने पुणे समता भूमी येथे समता परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला होता.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सुख दु:खात अडचणीत काम करण्याचं बळ मिळते ते उर्जा केंद्र महात्मा फुले वाडा आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो नागरिकांना नजर पुन्हा एकदा मिळवून दिली. त्याप्रमाणे त्या काळात बहुजन समाजाला दृष्टी देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. केवळ नजर असून तुम्ही समाजासाठी काही करू शकत नसाल तर त्या नजरेचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते.

पुरस्काराला उत्तर देतांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मिळलेला हा पुरस्कार मी ज्या बहुजन समाजातून येतो त्या बहुजन समाजातून मिळाला असून त्यांचा मला मनस्वी आनंद आहे. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगीतले. ज्यांनी किडनी बदलली आहे त्यांना बदलल्यानंतर १० ते बारा वर्षाचे आयुष्य मिळते मात्र मला माझ्या आईने दिलेली किडनी आणि आजवर केलेल्या कामातून मिळालेल्या आशीर्वादातून मला २५ वर्षाहून अधिक आयुष्य लाभले. या कामाबद्दल मला आज महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझ्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना देतो असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *