कोरोना हॉटस्पॉट सोलापुरात मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट.
कोरोना हॉटस्पॉट सोलापुरात मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट.
सोलापूर, दि. २४ जून २०२०
मुंबई, ठाणे, पुणे नंतर सोलापुरात कोरोनाने थैमान मांडले असून सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला सोलापूर जिल्हा नंतर झपाट्याने कोरोनाच्या विखळ्यात सापडला. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या २२९ वर गेली असून कोरोनारुग्ण संख्या २१८७ एवढी झाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.
पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी सोलापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सुचना दिल्या. यात कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या अँटीजेन टेस्टचा वापर करा. शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करा. या चाचणीमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे अर्ध्या तासात कळते. त्यामुळे बाधा झालेल्या पण लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना वेगळे काढता येईल आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल.
शहरातील एकूण १५ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्राच्या अखत्यारित मृत्यूदर जास्त आहेत. या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आता जादा लक्ष द्यावे, कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवणे,खाजगी दवाखान्यात नियंत्रित दरानेच आकारणी केली जाते का असे यावर लक्ष देणे तसेच डॅशबोर्डवर कोरोनाबाधित, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षात ठेवलेले रुग्ण अथवा मृत्यू झालेले रुग्णांची माहिती अचूक करा, अशा सूचना म्हैसेकर यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, महिला बाल विकास अधिकारी विजय खोमणे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते.
