ऐतिहासिक आंबडवे गावाला ‘वंचित’ची मदत!
ऐतिहासिक आंबडवे गावाला ‘वंचित’ची मदत!
मुंबई, दि. २४ जून २०२०
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव म्हणजेच आंबडवे, हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. ऐतिहासिक असलेल्या या गावची परिस्थिती आज खूप वाईट आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने आज या गावकऱ्यांना मोठया प्रमाणावर मदतीची गरज आहे. मागासवर्गीयांची मते व सहानुभूती मिळविण्यासाठी आंबडवे हे गाव अनेक राजकीय नेत्यांनी दत्तक घेतले. मात्र दत्तक घेणाऱ्यांचे काम आणि मदत शून्य असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आधीच लॉकडाउनचा फटका त्यात चक्रीवादळाचा मार यामुळे गावकऱ्यांचे कंबरडेच मोडले. अशीच वाईट स्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव असलेल्या आंबडवे गावची झाली. वादळाने हे गाव पार नेस्तनाबूत करून टाकले. बाबासाहेबांचे गाव आहे म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी या गावाला भेट देऊन ते दत्तक घेतले. त्यामागे एकच कारण बाबासाहेबांवर आणि त्यांच्या गावावर कोट्यवधी अनुयायी प्रेम करतात.त्यामुळे त्यांची सहानुभूती आणि मतांसाठी हे गाव दत्तक घेण्याची चढाओढ सुरू झाली.
गावाची व्यथा कळल्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व गावकऱ्यांना तात्काळ मदत दिली. गावातील लोकांना अन्नधान्य नसल्याचे सांगण्यात आल्याने येत्या दोन दिवसात अन्नधान्य वाटण्यात येईल असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. सोबतच गावकऱ्यांना मदत म्हणून शाल, चादरीसह इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा न करता प्रत्यक्षात मदत देऊन कृती करून दाखविल्याने त्याचा आनंद गावकऱ्यांना झाला. केवळ मतांसाठी नाही तर आपुलकीने प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
