नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद!

0
20201122_181630

नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच !

नाशिक जिल्ह्यातील ४० शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह…

नाशिक, दि २२ नोव्हेंबर :

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबर पासून रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारी २०२१ पर्यंत संस्थगित करण्यात आला आहे. डिसेंबरच्या अंतिम टप्प्यात फेरआढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून निर्णय घेण्यात येणार येईल अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे. या चर्चेतूनच जोखीमेची शक्यता पाहता शाळा सुरू न करता तुर्तास संस्थगित ठेवणे योग्य राहिल असा सूर सर्वांचा दिसून आला.

शहरी भागातील पालकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत फारशी अनुकुलता दिसून येत नाही. तर ग्रामीण भागात ५० टक्के लोकांमध्ये ती अनुकुलता दिसून येते. अशाही परिस्थितीत शाळा सुरू केल्याच तर सुट्ट्या वगळता १८ दिवस शाळा सुरू राहतील. त्यात अर्धे विद्यार्थी ९ दिवस आणि उरलेले अर्धे ९ दिवस शाळेत येतील या पार्श्वभूमीवर केवळ ९ दिवसांसाठी शाळा सुरू करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.

कोरोनाची हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी नाताळची सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील सुमारे ४० शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे त्यामुळे ४ जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंदच राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *