पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला वज्रलेपन का केले जाते ?

0
pandharpur vithoba

पंढरपूर, दि. २३ जून २०२०

पंढरपूरच्या सावळ्या विठूराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास मंगळवारपासून सुरवात झाली आहे. भारतीय पुरातत्व विभाग, पुरातत्व रसायनतज्ज्ञ, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीला वज्रलेप करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लेपनात पहिल्या दिवशी मूर्तीची स्वच्छता केली जाणार असून दुसऱ्या दिवशी रासायनिक लेपन केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मूर्ती शेकडो वर्ष जुन्या आहेत. मूर्तीवर दुध, दही, साखरेचा वापर होत असल्याने मूर्तीची झिझ होऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिर समितीने पुरातत्व विभागाकडे या मुर्तीचे संवर्धन करण्यासाठी अभिप्राय मागवला होता.त्यानुसार सर्वप्रथम १९८८ साली दोन्ही मूर्तीवर वज्रलेप अर्थात रासायनिक लेपन करण्यात आले. त्यानंतर २००५ आणि २०१२ रोजी पुन्हा लेपन करण्यात आले. वास्तविक पाहता दर पाच वर्षांनी लेपन केले तर मूर्तीची झिज होणार नाही असे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. मात्र पुढील काळात वज्रलेप झाला नाही.

मूर्तीच्या वज्रलेपनासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला त्यानंतर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या पथकाने मूर्तीची पाहणी करुन लेपन कामाला सुरवात केली. तत्पूर्वी मंदिर समितीचे सदस्य आणि सल्लागार परिषदेचे ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, विठ्ठल दादा वासकर महाराज, शिवणीकर महाराज या सर्वांनी या वज्रलेपास अनुमती दिली. दोन दिवसात या लेपनाचे काम पूर्ण होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे लेपन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *