तीन महिन्यांचे सरसकट वीजबिल देणाऱ्या वीज कंपन्यांचा ‘प्रताप’ थांबवा!

0
Fadnavis dev

मुंबई, दि. २३ जून २०२०

कोरोनाच्या तीन महिन्याच्या लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना सरासरी बिले पाठविली आणि लोकांनीही ती भरली आहेत. आता अनलॉक १ मध्ये ज्या काही भागात परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी रिडिंग घेऊन बिले पाठवण्चे काम वीज कंपन्या करत आहेत मात्र ही वीजबिले आकारताना त्यात जुनी भरलेली रक्कम वजा न करताच भरमसाठ वीज बिले दिली जात असून जनतेत याबद्दल आक्रोश असून वीज कंपन्यांचा हा सावळा गोंधळ सामान्य माणसांना त्रासदायक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वीज कंपन्यांच्या या अन्यायी बिल आकारणीचा समाचार घेतला आहे. कोरोना टाळेबंदीमुळे लाखो लोकांच्या वेतनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अनेकांचे रोजगार गेले आहेत अशात एकदम तीन महिन्यांची विजबिले आल्यामुळे ती एकरकमी भरण्याच्या समस्या लोकांपुढे निर्माण झाल्या आहेत.

अनेकांनी ऑनलाईन वीज बिले भरली असतानाही त्यांना वाढीव बील देण्यात आले आहे. काहींना तर दहा-दहा हजार रूपयांपर्यंत बीले पाठवण्याचे ‘प्रताप’ वीज कंपनीने केले आहेत. औद्योगिक ग्राहकांचीही तीच अवस्था असून तीन महिने उद्योग बंद असतानाही त्यांना भरमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहे. घरगुती ग्राहक आणि उद्योग अशा दोघांच्याही समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सरासरी भरलेली बिले आणि आता तीन महिन्यांचे एकत्रित बिल यामुळे प्रचंड आर्थिक भार या ग्राहकांवर पडला आहे. खरे तर घरगुती ग्राहकांकडून लॉकडाऊनच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे त्याचा विचार सरकारने करावा, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *