अर्णबना आणखी एक दणका; फेरचौकशी बेकायदा नाही.
कोर्टाचा अर्णबना आणखी एक दणका; फेरचौकशी बेकायदा नाही.
मुंबई, दि. ९ नोव्हेंबर:
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई हाय कोर्टाने आणखी एक झटका दिला. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी फेरचौकशी करण्यात येत आहे ती योग्यच आहे, असा निर्वाळा हाय कोर्टाने आज दिला आहे.
अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी जो फेरतपास सुरू करण्यात आला आहे तो बेकायदा ठरवला जाऊ शकत नाही असे कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले आहे. तपास अधिकाऱ्याने न्यायदंडाधिकारी न्यायालयात ए-समरी अहवाल दाखल केला आणि न्यायालयाने तो स्वीकारला म्हणून तपास अधिकाऱ्याला फौजदारी दंड संहितेच्या कलम १७३ (८) अन्वये न्यायालयाला अवगत करवून अधिक तपास करण्यास आडकाठी आहे, असे नाही. तपास अधिकाऱ्याला अधिक तपास करण्याचा अधिकार आहे’, असे खंडपीठाने नमूद केले आहे.
अलिबाग न्यायदंडाधिकारी कोर्टाने प्रकरण बंद करण्यापूर्वी फिर्यादी नाईक कुटुंबाला नोटीस दिली नाही आणि प्रोटेस्ट पीटिशन दाखल करण्याची संधीही दिली नाही, हे या प्रकरणाच्या मुळाशी आहे. म्हणूनच फिर्यादी अक्षता नाईक यांनी तपासासाठी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर तपास अधिकाऱ्याने न्यायदंडाधिकारी कोर्टाला अवगत करून पुन्हा तपास सुरू केला. हे कोणत्याही प्रकारे बेकायदा ठरवले जाऊ शकत नाही.
आरोपीला जसे मूलभूत हक्क असतात, तसेच पीडितालाही असतात. त्यामुळे ही परिस्थिती पाहता अधिक तपास होऊ शकत नाही, हे याचिकादारांचे म्हणणे आम्ही स्वीकारू शकत नाही’, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे.
