मुंबई-ठाणे मेट्रो ४ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

0
20201107_131501

सुमारे दोन लाख प्रवासी दररोज प्रवास करतील..

मुंबई, दि. 7 नोव्हेंबर :
मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही देतानाच मुंबई महानगर परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४ अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी  केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून त्यामुळे मुंबईकराचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महानगरे जोडली आहेत. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शिंदे यांनी कौतुक केले.

 

यावेळी राजीव यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *