कोरोनाकाळात 1 लाख 15 हजार रोजगार!
कोरोना संकटकाळात 1 लाख 15 हजार बेरोजगारांना रोजगार.
मुंबई, दि. 06 :
कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टल मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात ऑक्टोबर अखेरपर्यंत एकुण 1 लाख 15 हजार 928 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यातच 30 हजार 500 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 1 लाख 48 हजार 343 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.
मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.
मुंबईत ऑक्टोबरमध्ये 16 हजार जणांना रोजगार…
ऑक्टोबरमध्ये विभागाकडे 55 हजार 890 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 20 हजार 793, नाशिक विभागात 5 हजार 375, पुणे विभागात 14 हजार 577, औरंगाबाद विभागात 9 हजार 915, अमरावती विभागात 2 हजार 717 तर नागपूर विभागात 2 हजार 513 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 30 हजार 500 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 16 हजार 349, नाशिक विभागात 1 हजार 458, पुणे विभागात 7 हजार 565, औरंगाबाद विभागात 3 हजार 106, अमरावती विभागात 1 हजार 145 तर नागपूर विभागात 877 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
