वाहक गावडेंच्या मृत्यूस जबाबदार कोण?
मुंबई, दि. 1 नोव्हेंबर :
मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे.
गावडे यांना मूळव्याधीचा त्रास होता. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे उपचार मिळावा म्हणून तक्रार केली. मात्र वेळेवर दखल न घेतल्याने उपचाराविनाच त्यांना जीव गमवावा लागला आहे.
गावडे यांच्या मृत्यूनंतर एस टी कर्मचा-यांमध्ये प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या संकटकाळी बस व एस टी सेवा सुरू करण्यात आली असली तरी चालक वाहक व इतर कर्मचा-यांना योग्य त्या सुविधा मिळत नाही. प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. गावडेंच्या मृत्यूस जे जबाबदार असतील त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
