महाराष्ट्रात ४०० कोटींचा गैरव्यवहार !
मुंबई, दि. २८ ऑक्टोबर:
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानाच्या सेवेत कायम करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रात ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याची तक्रार केली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
फडणवीस म्हणतात, “राष्ट्रीय आरोग्य मिशन या केंद्र सरकारच्या योजनेची केंद्राच्या निधीतून राज्य सरकार अंमलबजावणी करते. त्यासठी उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणार्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला. जवळपास २० हजार असे उमेदवार राज्यात असून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून १ ते २.५० लाख रूपये घेतले जात आहेत.
वास्तविक पाहता यासाठी उमेदवारांकडून फक्त एक रूपयांचे सहमतीपत्र आणि ५०० रूपये लढा निधी संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते. परंतु स्वतंत्रपणे एक ते दोन लाख रुपये घेण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर आहे. यातून ४०० कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. हे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
