दसऱ्याला सराफा बाजार मात्र थंडच!
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर :
दसरा दिवाळी या सणांच्या दिवशी सोने खरेदी करण्याकडे लोकांचा मोठा कल असतो. साडेतीन मूहुर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला दरवर्षी सोने खरेदीसाठी झुंबड उडते. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते पण अनलॉकमुळे बाजारात दसऱ्याला गर्दी वाढली पण सोने खरेदीला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला.
सोने खरेदी कमी होण्यामागे सोन्याचे वाढलेले भाव हे मुख्य कारण असल्याचे समजते. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी सोने ३८ हजार रुपये तोळा होते तर यंदा ५१ हजार रुपये तोळा. तब्बल १३ हजार रुपये तोळ्यामागे भाववाढ झाल्याने लोकांनी सोने खरेदीसाठी हात आखडताच घेतला. मोठे हार, दागिने खरेदी करण्याऐवजी छोटे दागिने घेण्यास ग्राहकांनी पसंती दिली. सोन्याचे भाव वाढल्याने त्यात गुंतवणुक करण्यासही लोकांनी उत्साह दाखवला नाही. सोन्याची नाणी खरेदी करण्याकडे मात्र ग्राहकांचा कल राहिला.
यावर्षी दसऱ्याला बाजारात मागणी घटली. ‘कोरोना, टाळेबंदी, नोकरकपात यामुळे सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मुंबईत मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ५० टक्केच प्रतिसाद मिळाला.
