Ads

--

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी तेजीत!

By Xtralarge News

October 26, 2020 11:18 am

Ads

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर:
कोरोनामुळे बाजारात आलेली मंदी दसऱ्याच्या मुहुर्तावर तेजीत दिसली. विशेषतः वाहन उद्योगाने दसऱ्याच्या दिवशी टॉप गीअर टाकला. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जात असलेल्या दसऱ्याला मुंबईकरांनी तर भरघोस प्रतिसाद दिलाच पण राज्याच्या इतर भागातही वाहन खरेदी चांगली झाली.

मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर ८२१ गाड्यांची नोंदणी करण्यात आली. या वाहन खरेदीत दुचाकीला जास्त पसंती दिसली. ५५४ दुचाकी तर २६७ चारचाकी वाहनांची खरेदी काल मुंबईत झाली. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे. या वाहन खरेदीमुळे सरकारी तिजोरीतही भर पडली. मुंबईतील चारही आरटीओंच्या माध्यमातून सरकारला एकाच दिवसात जवळपास अडीच कोटी रुपयांचा कर मिळाला.

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्येही दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला लोकांनी पसंती दिली. कोरोनामुळे वाहन उद्योग मंदीत होता फक्त ट्रॅक्टरला मागणी जास्त होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला मिळालेला प्रतिसाद हा या क्षेत्रातील उत्साह वाढवणार ठरला.

कोरोनामुळे अजूनही सार्वजनिक वाहतूक सुरुळीत सुरु नाही त्यामुळे दुचाकी खरेदीकडे मोर्चा वळवल्याचे जाणवते. चारचाकी वाहन खरेदीमध्ये सीएनजीच्या वाहनांना मागणी जास्त दिसली.

बाजारात तेजी यावी यासाठी सुलभ कर्जाची सोयही अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी केली होती. त्यात क्रेडिट-डेबिट कार्डवर कॅशबॅक, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलत, कमी हप्ता, ऑन द स्पॉट डिलिव्हरी अशा सवलतीमुळेही ग्राहकांनी वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद दिला.

No comments to show.

Leave a Comment