मुंबई, दि. २२ ऑक्टोबर:
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रोखठोक टीका करणाऱ्या शिवसेनेने त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित केलेले मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते असे सामनाच्या संपादकीय लेखात म्हटले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावाल्या आहेत.
या अग्रलेखात असे म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते,”
“लॉकडाउन संपलाय, पण करोना संपलेला नाही. देश अजूनही कोरोनाशी लढतोय. ही माणूस जगविण्याची, मानवतेची लढाई असल्याचे त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते,” असे लिहिले आहे.
“सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे,” असा टोमणाही या अग्रलेखातून लगावला आहे.