‘सब का विश्वास’ हे मोदींचे ढोंग आहे का?

0
20200731_182157

मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२०:
सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा अपमान करणारे महाराष्ट्र भाजपाचे नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या नादात आपल्या वरिष्ठ नेत्यांनाही जुमानेसे झाले आहेत. महाराष्ट्रातील मदरसे बंद करा म्हणणाऱ्या अतुल भातखळकर यांनी मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसते. मग मोदींचे ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे का? हा प्रश्न काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, अतुल भातखळकरांनी महाराष्ट्रातील मदरसे बंद करावे अशी मागणी करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या भुमिका काय आहेत हे तपासले असते तर बरे झाले असते.
२० ऑगस्ट २००१ रोजी तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी पंतप्रधान वाजपेयी यांची मरदशांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची कोणतीही इच्छा नाही हे स्पष्ट केले होते तसेच मदरशांचे आधुनिकीकरण करुन तेथील धार्मिक शिक्षणाच्या कामात हस्तक्षेप न करता विज्ञान, गणित, समाजशास्त्र व सामान्यज्ञान हे विषय तेथे शिकवले जावे हे स्पष्ट केले होते.
फेब्रुवारी २००२ मध्ये जोशी यांनी जवळपास एक हजार मदरशांना केंद्र सरकार अनुदान देत आहे असेही सांगितले होते. वाजपेयी यांचाही भाजपा नेते अवमान करत आहेतच, नरेंद्र मोदींच्या भूमिकेचीही तमा ते बाळगत नाहीत हे आश्चर्य आहे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१२ च्या निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जाहिरनाम्यात सुद्धा मदरशांच्या आधुनिकीकरणाचा दोनदा उल्लेख केलेला आहे.
११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावलं उचलून तेथील शिक्षकांना अन्य संस्थांकडून हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल याकरता योजना जाहीर केली होती.
नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम युवकांकरता एका हातात कुराण व दुसऱ्या हातात संगणक हे व्हिजन असल्याचे सांगितले होते. आणि ‘सब का विश्वास’ ही घोषणा दिली होती. असे असताना भातखळकरांचे वक्तव्य पाहता मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे अधोरेखीत होते.
भातखळकरांच्या भुमिकेशी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहमत आहेत का?  असल्यास मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे अन्यथा भातखलकरांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *