महाराष्ट्रात कोणत्या सौरऊर्जा प्रकल्पाची चाचपणी झाली?
महानिर्मिती-एनटीपीसीच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प!: डॉ. नितीन राऊत
नागपूर १८ जून २०२० :
राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्युत भवन नागपूर येथून व्ही. सी. द्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढे सांगितले की, एनटीपीसीने (NTPC) हा वीज प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सौरऊर्जा, पवनऊर्जा, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती यासारख्या हरितऊर्जा प्रकल्पाकडे सर्वांनी गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी राऊत यांनी व्यक्त केले आहे.
सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञानी विचार करावा असे निर्देश राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती घेतली तसेच नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथील २५० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावाही घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी सूचना डॉ. नितीन राऊन यांनी अधिकाऱ्याना दिल्या.
