एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही.

0
IMG-20201017-WA0074

पंढरपूर, दि. १७ ऑक्टोबर  :

गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वा नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावलेल्या कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यानी घेतली.

उपमुख्यमंत्री म्हणाले, परतीच्या पावसाने महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण केली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. घाटबांधकामाबाबत चौकशी करुन दोषी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट देवून नुकसानग्रस्त पिकांची तसेच पुरग्रस्त भागांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. पटवर्धनकुरोली येथे शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *