बेस्टने कोरोना काळातील वीज बिलात सवलत द्यावी.
बेस्टने कोरोना काळातील वीज बिलात सवलत द्यावी.
मुंबई, दि. १८ जून 2020
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात मुंबईतील उद्योग, व्यवसाय, दुकाने व कार्यालये बंद राहिल्याने व्यावसायिकांना या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अनेकांचा पगार किंवा उत्पन्नाचे साधनही बंद झाले आहे. त्यामुले विज बिल भरणे अशक्य झाले आहे. लॉकडाऊनचे संकट व बंद व्यवसाय लक्षात घेता बेस्टने वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
लोढा म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने लोकांना गतवर्षीच्या विज वापराच्या सरासरीने वीज बिले पाठवली आहेत. नुकसानीत असलेल्या व्यावसायिकांना आणि उत्पन्नाचे साधन हरवलेल्या नागरिकांना हे संपूर्ण रकमेचे वीज बिल भरायला लावणे हा अन्याय आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळातील व्यावसायिक आणि घरगुती वापराची वीज बिले ही किमान रकमेनुसार आकारावीत अशी मागणी मुंबई भाजपाकडून करण्यात आली आहे. वीज बिलात सवलत मिळाल्यास अडचणीत आलेल्या व्यावसायिक आणि नागरिकांना सावरण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने या गंभीर विषयात तातडीने निर्णय घ्यावा.केंद्र सरकार नागरिकांना विविध सवलती देत असताना बेस्ट उपक्रमानेही वीज बिलात सवलत देऊन आपला वाटा उचलावा असे आवाहनही मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मंगलप्रभात लोढा यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून यासंदर्भात चर्चा केली. मुंबईतील नागरिकांना वीज बिलामध्ये तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी लोढा यांनी यावेळी बागडे यांच्याकडे केली आहे.
