राज्यपाल कोश्यारींना बडतर्फ करा !
सोलापूर, दि. 14 ऑक्टोबर:
संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे. राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे. त्या पत्रातील भाषा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी आहेच शिवाय त्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याचा दिलेला अनाहूत सल्ला राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक आहे. आपल्या अशोभनीय राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यपालांनी दुर्धर प्रसंग आणला आहे. अशा राज्यपाल कोश्यारी यांंना राष्ट्रपती यांनी तात्काळ पायउतार करावे ही मागणी माकपाचे सचिव नरसय्या आडम यांनी केली आहे.
कोव्हिड महामारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात महाराष्ट्र सरकार आणि जनतेला प्रयत्नांची शर्थ करावी लागली आहे. राज्यात नाजूक स्थितीत असलेली आरोग्य व्यवस्था राज्यपालांनी दिलेल्या अनाठायी सल्ल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवावी लागेल. असा घातक सल्ला देत असतानाच राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे. त्या संविधानाची शपथ घेऊनच आपण हे संविधानिक पदग्रहण केले आहे, यांचा त्यांना सोयिस्कर विसर पडलेला दिसतो. हा सल्ला जनतेच्या भल्यासाठी नसून त्यामागे खोडसाळ राजकीय उद्दिष्ट आहे, हे स्पष्ट आहे. असा सल्ला आणि त्यासाठी वापरलेली अशोभनीय भाषा राज्यपालपदाचे अवमूल्यन करणारी आहे.
राज्यपाल हे राज्याच्या राजकारणात नसता हस्तक्षेप करू लागले आहेत, याविषयी संशयाला जागाही राहिलेली नाही. जणू काही ठरल्यानुसार याच मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरला आहे. ही सरळसरळ जनतेच्या एका विभागाला दिलेली चिथावणी असून महामारीच्या काळात आवश्यक असलेली नियंत्रणे आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था उधळणारे कृत्य आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्याच्या आरोग्याला हानिकारक बनले आहेत, असे ‘माकप’ला नाईलाजाने म्हणावे लागत आहे. ” __ये बापू हमारी सेहतके लिये हानिकारक हैं_ !
आपल्यावर सोपवण्यात आलेली संविधानिक जबाबदारी पार पाडण्यास कोश्यारी असमर्थ असल्याचे त्यांनी स्वत:च दाखवून दिले आहे. त्यामुळे कोश्यारी यांनी संविधानाचा आणखी जास्त उपमर्द करण्यापूर्वी राष्ट्रपती यांनी त्यांना जबाबदारीतून त्वरीत मुक्त करावे, अशी मागणी माकपाने केली आहे.
