बाळासाहेब विखेंनी राजकारणाला समाज बदलाचे माध्यम मानले!

0
IMG_20201013_232250

अहमदनगर, दि.13  ऑक्टोबर :
माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला, अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहिलेल्या राजहंस प्रकाशनच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला.

यावेळी प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांच्या मनोगतातून केला.

प्रधानमंत्री म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र जरी आता प्रकाशित झाले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर, केंद्रीय मंत्रीपद सांभाळताना त्यांनी केलेल्या कामामुळे देशभरात ही ओळख अधोरेखित झाली. राजकारणाला समाज बदलाचे माध्यम मानून त्यांनी काम केले. सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्रात त्यांनी केलेले काम इतरांना प्रेरणा देणारे आहे. पाणीप्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे काम केले. सहकार चळवळ ही कोण्या एका जातीपातीपुरती मर्यादित नसून ती सर्वसमावेशक आहे, असे मानून त्यांनी सर्वांना प्रतिनिधीत्व दिले, असे ते म्हणाले.

ज्यावेळी ग्रामीण भागातील शिक्षणाची देशात चर्चा होत नव्हती, त्यावेळी त्यांनी लोणीसारख्या ठिकाणी प्रवरा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणास प्रोत्साहन दिले. कौशल्याधारित शेतीचा आग्रह धरला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आज शेती क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा सहन करणारा देश आज शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनी अन्नधान्यांत स्वयंपूर्ण बनला आहे. त्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न होत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *