बार, हाॅटेल सुरु झाले, देवच कुलुपबंद का?
मुंबई, दि. 13 ऑक्टोबर :
राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच विचारणा केली आहे. मंदिर उघडा या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी व विविध धार्मिक संघटना यांनी मागणी लावून धरली आहे. आता तर राज्यपाल यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंदर्भात काही प्रश्नही विचारले आहेत.
या पत्रात राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. बार, रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?” असे प्रश्न या पत्रात उपस्थित केले आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘ जूनच्या पहिल्या आठवड्यात जनतेला संबोधित करताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा तुम्ही केली होती परंतु तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत. 11 ऑक्टोबर रोजी संवाद साधताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली.
एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय नेते यांचाही समावेश होता.’ अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली आहे.
