आता कोल्हापूरी चप्पलही ‘अमेझाॅन’वर!
कोल्हापूर, दि. 13 ऑक्टोबर:
चप्पल म्हणताच कोल्हापूरी हे नाव आपसुकच तोंडावर येतं. कोल्हापूरी चप्पलनं जगाला भुरळ पाडलीय. विशिष्ठ पद्धतीने बनवलेल्या खास चामड्याच्या चप्पल म्हणजे कोल्हापूरीच. या चप्पलने देशभर नावलौकीक तर मिळवला आहेच. सध्या ऑनलाईन मार्केटिंगचा ट्रेंड आहे. सब कुछ ऑनलाईन च्या जमान्यात कोल्हापूरी चप्पल तर मागे कशी राहील.
आता कोल्हापुरी चप्पलही ॲमेझॉनवर वर उपलब्ध झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्रीला सुरूवात करण्यात आली.
कोल्हापुरचा गुळ, काकडी, मध, कोल्हापूरी कांदा व लसूण चटणी, मिरची पावडर, कोल्हापूरी दागिने सुद्धा अमेझाॅनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१०० इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे.
