मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण?
मुंबई, दि. 12 ऑक्टोबर:
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह एमएमआरडीए भागात आज सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज गेल्याने लोकलसह अख्यी मुंबई बंद पडली होती. दुपारनंतर टप्प्याटप्प्याने लाईट आली. पण या प्रकारामुळे सामान्य माणसाला प्रचंड मनस्ताप झाला. लोकलने ऑफीस गाठणारी मध्येच लटकले. कोरोना काळात घडेलेल्या या प्रकारामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बत्ती गुल प्रकरणी ठाकरे सरकार टीकेची झोड उठवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’संपूर्ण मुंबईला आज वीजे अभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या कालखंडात तर हा फटका आणखी गंभीर बनला. सर्वसामान्यांच्या जीवनात खंड पाडणार्या आणि यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण? आतातरी महाविकास आघाडीचे सरकार स्वत:हून पुढाकार घेऊन पुन्हा अशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी पाऊले टाकेल का? अशी अपेक्षा आपल्याला आता तरी करता येईल का?
रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा ठप्प पडल्या होत्या. या प्रकाराच्या चौकशीतून काहीतरी निष्पन्न निघेल आणि याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित केली जाईल, अशी आशा करू या!, असे फडणवीस म्हणाले.
