मोदींसाठी 8 हजार कोटींचे आलिशान विमान, जवानांसाठी…..?
नवी दिल्ली, दि.10 ऑक्टोबर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा तोफ डागली. मोदी यांनी स्वतःसाठी ८४०० कोटी रुपये खर्चुन आलीशान विमान खरेदी केले मात्र जवानांना बुलेटप्रुफ ट्रक, आवश्यक सुविधाही न देता शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
जवानांना दिल्या जाणाऱ्या सुविधेवरून राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी ही मोदी यांना लक्ष्य केले आहे, ‘पंतप्रधानांनी आपल्यासाठी ८४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे ३० लाख, जॅकेट-ग्लोव्ह्ज ६० लाख, बुट ६७ लाख २० हजार, ऑक्सिजन सिलिंडर १६ लाख ८० हजार.. पण पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही.’
चीन आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांना सातत्याने प्रश्न विचारत असतात.
