उपसरपंचांसाठी गोड बातमी; आता त्यांनाही मिळणार मानधन…

0
grampanchayat 11

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन!: हसन मुश्रीफ

उपसरपंचांना दरमहा १०००/१५०० व २००० असे लोकसंख्येनुसार मानधन.

मुंबई, दि. १७ जून २०२० :

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशीर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे ही सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण १५.७२ कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

उपसरपंचांना मिळणारे हे मानधन गावाच्या लोकसंख्येनुसार आहे. २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये तर २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये मानधन देण्यात येत आहे.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

सरपंचांचे थकित मानधनही झाले जमा.

राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहीले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *